अलिबाग रायगड:खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत झालेल्या क्रिडा स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका पाटील हीने रुपेरी यश मिळविले. तिच्या या सुवर्ण कामगिरीने अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.13) श्रमिका पाटील हीचा विशेष सत्कार करण्यात आला. शेतकरी भवन येथील सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ, सुडकोलीचे माजी सरपंच जयवंत तांबडकर, श्रमिका पाटीलचे वडील श्रीधर पाटील, आई श्रध्दा पाटील, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
खेळो इंडिया अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा नुकत्यात गया (बिहार) येथे पार पडली. गतका मार्शल आर्ट या क्रिडा प्रकारात श्रमिका श्रीधर पाटील हीने उत्तम कामगिरी बजावत रौप्य पदक मिळविले. खेळो इंडिया अंतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत पदक मिळविणारी रायगड जिल्ह्यातील पहिली खेळाडू असल्याचा बहूमान श्रमिका पाटील हीने मिळविला आहे. तिच्या कामगिरीने अलिबागसह रायगड जिल्हयाचे नाव लौकिक झाले असून अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
खेलो इंडिया युवा खेळ ही भारत सरकारद्वारे आयोजित केली जाणारी एक राष्ट्रीय स्तरावरील बहू क्रीडा स्पर्धा आहे. शाळेसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील खेळाबाबतची प्रतिभा ओळखणे, त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपिठ मिळवून देण्याबरोबरच क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत बिहारमधील गया येथे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका पाटील हीने सहभाग घेतला होता. गतका मार्शल आर्ट क्रिडा प्रकारात तिने उत्तम कामगिरी करीत रौप्य पदक मिळविले. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमिका पाटील हीचा पुष्पगुच्छ, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.









