अलिबाग रायगड : रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. राज्यसभा सदस्य मा. धैर्यशील पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील,आस्वाद पाटील तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनिक प्रतिनिधी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या मान्यतेने ही बैठक आयोजित केली.
बैठकीत पाणीपुरवठा योजना, रस्ते विकास, जलजीवन मिशन, शिक्षण, आरोग्य, महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, स्थानिक समस्यांचा निवारण, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
या संदर्भात माहिती देताना म्हात्रे म्हणाले, “खासदारांनी अनेक प्रश्नांवर चर्चा केली. ही बैठक पूर्वनियोजित होती. जलजीवन मिशनसह अनेक प्रलंबित कामांवर चर्चा झाली. एकूणच सकारात्मक चर्चा झाली.”
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्थानिक पातळीवरील अडचणी मांडत उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले. प्रशासनानेही सहकार्याचे आश्वासन दिले असून, ही बैठक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.









