अलिबाग-वडखळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न सोडवण्याची केली मागणी
अलिबाग रायगड : अलिबाग-वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न तातडीने सोडवावा यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप यांनी महायुतीला दिला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
गेल्या काही वर्षांपासून अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अलिबाग-वडखळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विशेषतः वीकेंडला अलिबाग वडखळ प्रवासासाठी दोन तासांचा अवधी लागत आहे. त्यामुळे 3पर्यटक प्रचंड हैराण होत आहेत.
अलिबाग-वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू होणे गरजेचे आहे, असे धारप यांनी नमूद केले आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा सदस्य यांनी एकत्र येऊन नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, अलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण करताना कार्लेखिंड घाटातून बोगदा काढावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
शेकापाचा गाजावाजा हवेत विरला
सुमारे तेरा वर्षांपूर्वी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी मोठा गाजावाजा करून अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असे सांगितले होते. अलिबाग-वडखळ हा प्रवास केवळ १२ मिनिटात पार करता येणार, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही.









