नांदवीच्‍या श्री बापूजी देवाचा जत्रोत्‍सव उत्‍साहात


अलिबाग – रायगडच्या माणगावमधील नांदवी गावचे ग्रामदैवत श्री बापुजी महाराज यांचा चैत्रपौर्णिमेला होणारा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. यानिमित्ताने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले  होते. गावागावातून येणारया जत्‍तरकाठया , पालख्‍या आणि बगाडावरून फिरणारी लाट या जत्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.
श्री बापूजी महाराज हे नांदवी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्‍थान आहे.  सकाळपासूनच जत्रेतील पूजाअर्चा व  धार्मिक विधीला सुरूवात सुरूवात झाली. संध्‍याकाळी दर्शनासाठी भाविकांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या. ग्रामीण भागातून आलेल्या जत्तरकाठ्या खालूबाजाच्‍या तालावर नाचवण्याची जणू स्पर्धा लागली होती. रात्री उशिरा फलाणी, कोकरे येथील ग्रामदेवतांबरोबरच शिर्के ताम्‍हाणे येथील भीमादेवीची पालखी श्रीबापूजी महाराजांच्या भेटीसाठी आल्या होत्या. जाखमाता देवीचा मनगटावर गळटुपणीचा कार्यक्रम पार पडला. भीमादेवीची पालखी नाचवण्याची कला भाविकांचे आकर्षण ठरले. जत्रेच्‍या निमित्‍ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्‍यात आली होती.
   सर्वधर्म समभावाचे प्रतिक मानल्‍या जाणारया या जत्रोत्‍सवात सर्व जातीधर्माच्‍या समाजाला पारंपरिक ठरलेले मान दिले जातात. ही परंपरा आजही जतन करण्‍यात आली आहे. मंदिरासमोरील बगाडवरून लाट फिरवण्याची प्रथा मागील अनेक वर्षे बंद होती. यावर्षी नवीन बगाड बांधून लाट फिरवली गेली. सात वतनदार यांना विशेष मानकरी म्‍हणून मान देण्‍यात आला.  यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात आली. लाट फिरवण्‍याचा सोहळा अनुभवण्‍यासाठी  भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. जत्रेच्‍या निमित्‍ताने विविध प्रकारची खेळणी , मिठाई तसेच खाद्यपदार्थाची दुकाने थाटली होती. त्‍यातून मोइी आर्थिक उलाढाल झाली. व्‍यावसायिकांना चांगला व्‍यवसाय उपलब्‍ध झाला. रात्रभर ही जत्रा सुरू होती. सकाळी जत्रेची सांगता झाली. यावेळी जत्रेसाठी आलेल्‍या जत्‍तरकाठ्या आणि पालख्‍यांना त्‍यांचे मान देण्‍यात आले. श्रीबापूजी महाराजांची पालखी त्‍यांना निरोप देण्‍यासाठी केस्‍तुली येथील होळीपर्यंत आली होती. या जत्रेला पंचक्रोशीतील भाविकांसह मुंबईतील चाकरमानीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
   जत्रा कमिटीतर्फे भाविकांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. पालखी, जत्‍तरकाठी नृत्य, आणि खालुबाजाचा जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. संपूर्ण माणगाव तालुक्यात या पारंपरिक जत्रेला विशेष महत्त्व आहे.