रायगड माणगाव येथील गवळी समाजाच्या यादव सहाय्यक समितीला नवीन इमारतीसाठी शासनाचा ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.
रायगडचा पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातून विस्तव जात नाही. अशी स्थिती असतानाच सोमवारी दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि विशेष म्हणजे व्यासपीठावर दोघांमध्ये गुजगोष्टी सुरू असल्याचे पाहण्यास मिळाले. निमित्त होते माणगाव येथील एका भूमिपूजन कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांना कोपरखळ्या लगावल्याने उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.









