अहमदाबाद येथील झालेल्या एअर इंडिया च्या विमान दुर्घटना स्थळी पंतप्रधान मोदींची भेट…


अहमदाबाद :अहमदाबादमधील एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत 241 प्रवासी आणि 28 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, देशभरात शोककळा पसरली आहे.
विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच नियंत्रणाबाहेर गेले आणि BJ मेडिकल कॉलेजजवळ कोसळले. विमानात लंडनकडे जाणारे प्रवासी होते. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीषण आगीचा प्रसार झाला.
पंतप्रधान मोदी यांनी अपघातस्थळी प्रत्यक्ष भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी BJ मेडिकल कॉलेजच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी प्रवाशांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली आणि प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश दिले.
“ही दुर्घटना हृदयविदारक आहे. संपूर्ण देश या दुःखद प्रसंगात पीडितांच्या पाठीशी उभा आहे,” असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना ₹१० लाखांची मदत, तर जखमींना पूर्ण वैद्यकीय खर्च देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. Air India व Tata Groupकडूनही स्वतंत्र मदत जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी DGCA, NTSB (अमेरिका), आणि UK AAIB यांच्या संयुक्त तपासाची प्रक्रिया सुरू आहे. ब्लॅक बॉक्सपैकी एक सापडले असून डेटा विश्लेषण सुरू आहे.
ही दुर्घटना भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिका मानली जात आहे.