रायगड (प्रतिनिधी): रायगडचे आमदार व मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सध्या एक फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्धनग्न अवस्थेत मंत्री गोगावले एका काळ्या कपडे घातलेल्या व्यक्तीसमोर बसलेले दिसत आहेत. या व्यक्तीला ‘अघोरी मांत्रिक’ म्हणून संबोधले जात असून हा संपूर्ण प्रकार अघोरी पूजेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सदर प्रकार पालकमंत्री पदाच्या राजकीय इच्छेशी संबंधित असल्याचा दावा काही स्थानिक नागरिक आणि विरोधकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया अजून मिळालेली नसली तरी विरोधी पक्षांकडून टीका सुरू झाली आहे. “लोकशाहीत मंत्रिपद मिळवण्यासाठी कर्तृत्व आणि कामगिरी महत्त्वाची असते, अशा अघोरी प्रकारांचा अवलंब हास्यास्पद आहे,” असे वक्तव्य एका विरोधी नेत्याने केले आहे.
दरम्यान, गोगावले समर्थक या व्हिडिओबाबत ‘खोटे व अवास्तव’ असल्याचा दावा करत आहेत. “हा एक धार्मिक विधी होता, त्याचा अघोरी किंवा राजकीय हेतूशी काही संबंध नाही,” असा खुलासा काही समर्थकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ निर्माण झाली आहे.