रायगड (प्रतिनिधी): भाजपचे सक्रिय नेते दिलीप भोईर उर्फ ‘छोटम शेट’ यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भोईर यांच्या भाजपमधील असंतोषाच्या चर्चांना जोर मिळाला होता, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
विश्वासू कार्यकर्ते असूनही पक्षात दुर्लक्षित वाटत असल्याची भावना त्यांनी काही निकटवर्तीयांसमोर व्यक्त केली होती. शिवसेनेत स्थानिक पातळीवर अधिक सक्रिय भूमिका आणि विकासकामांत थेट सहभागाची संधी मिळणार असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
दिलीप भोईर यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला रायगडमध्ये बळ मिळणार असून आगामी स्थानिक निवडणुकीत त्याचा थेट परिणाम दिसून येईल, असा राजकीय वर्तुळातील अंदाज आहे. भोईर यांच्या समर्थकांनीही या निर्णयाचे स्वागत करत विजयाच्या घोषणा दिल्या.
(अधिकृत प्रवेश सोहळा लवकरच)
भोईर लवकरच शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहितीही समोर आली आहे.