आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचा डंका – ७४ पदकांची कमाई, Grand Championship Trophy पटकावली!


अलिबाग (प्रतिनिधी) : International Sports Jeet Kune-Do Federation तर्फे दिनांक १५ जून २०२५ रोजी अंधेरी, मुंबई येथील शाहाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य स्पर्धेत भारतासह नेपाळमधून ६०० हून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. काता (Kata – Formal Exercise) आणि कुमिते (Kumite – Fight) या दोन गटांमध्ये एकूण ८८० हून अधिक स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील Shotokan Karate-Do Academy (Grandmaster उमेश कुलकर्णी – ८वी डिग्री ब्लॅक बेल्ट) संस्थेच्या ३७ खेळाडूंनी भाग घेतला. शारिरीक आणि मानसिक क्षमतेच्या जोरावर त्यांनी एकूण ७४ पदकांची लक्षणीय कमाई केली. यामध्ये २५ सुवर्ण, २१ रौप्य आणि २८ कांस्य पदकांचा समावेश होता.

स्पर्धेतील सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या संघ म्हणून S.K.A. रायगड संघाला “Grand Championship Trophy” ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्याच्या गुणात्मक अग्रस्थानी असणाऱ्या सहभाग, शिस्त, सहकार्य आणि सरस कामगिरीसाठी देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या यशामागे सेन्साय सुशिला म्हात्रे (३री डिग्री ब्लॅक बेल्ट – पेझारी कराटे क्लास), सेन्साय मंगेश ठाकूर (१ली डिग्री ब्लॅक बेल्ट – डिक्सळ कराटे क्लास), तसेच सेन्पाय सेजल माने (ज्युनिअर ब्राउन बेल्ट – नागोठाणे टाऊनशिप क्लास) यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. तसेच सेन्साय निर्दोष म्हात्रे (२री डिग्री ब्लॅक बेल्ट) यांनी संघ व्यवस्थापक म्हणून उत्तम भूमिका बजावली.

या कामगिरीमुळे रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळून निघाले आहे.