अलिबाग (प्रतिनिधी):अलिबाग तालुक्यातील दिघोडी-सासवणे येथून दरवर्षी निघणारी साईदास पदयात्रा यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना झाली आहे. या पदयात्रेचे प्रमुख ठिकाणी आगमन होत असते आणि त्यात झिराड हे एक महत्त्वाचे स्थान आहे. यावर्षीही श्रीसाईंच्या पालखीचे झिराड येथे आगमन होताच गावात भाविकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
झिराड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. दर्शना दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली साई महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. रवींद्र म्हात्रे, साई क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अशोकभाई थळे आणि इतर सहकाऱ्यांनी साईभक्तांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. या प्रसंगी फुलांची उधळण, भजन-कीर्तन आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
पदयात्रेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो भाविक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे प्रस्थान करतात. यात्रेचा उद्देश केवळ धार्मिक नसून सामाजिक एकात्मता, भक्तिभाव आणि निस्वार्थ सेवेचा संदेश देणारा आहे. झिराड येथे झालेल्या स्वागताने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भक्तिभावाची आणि एकोप्याची जाणीव अधिक दृढ झाली.
यात्रेचा पुढील टप्पा ही गावोगावची सेवा, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असा अनुभव देणारा आहे. या साईदास पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, साईबाबांच्या कृपेने सर्वांनाच समाधान आणि शांती लाभो, हीच प्रार्थना.









