सत्तरीतील तरुण व्यक्तिमत्त्व भाई जयंत पाटील


7 जुलै शेतकरी कामगार पक्षाचे आधारवड भाई जयंत पाटील यांचा 70 वा वाढदिवस. भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचासुद्धा वाढदिवस 7 जुलै. आपल्या-आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या या दोघांमध्ये एक साम्य प्रकर्षाने जाणवते; ते म्हणजे, कोणी काहीही बोलले तरी आपल्याच विचारसरणीत कायम राहून, आपल्याच वेगाने आणि आपल्याच मार्गाने काम करत राहायचे. प्रचंड आत्मविश्वास, हे दोघांचे बलस्थान.
जयंतभाई यांच्याबद्दल म्हणायचे झाले तर ते एक धुरंदर राजकारणी, सहकारमहर्षी, धाडसी व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रात आपल्या व्यावसायिक उत्पन्नातील ठराविक भाग खर्च करून निराळा आदर्श निर्माण करणारे, आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व.
अर्थात, वरील प्रत्येक विषयावर वेगवेगळा प्रबंध तयार होईल असे भाईंचे काम आहे, कर्तृत्व आहे. पण, आजचे राजकारण आपण जाणतोच. तत्त्वहीन, फक्त स्वार्थासाठी राजकारणात वावरणाऱ्या लोकांना पाहिले की भाईंचे वेगळेपण लक्षात येते. सर्व पक्षातील त्यांची ओळख त्यांच्याबद्दलची या ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकांची आदरभावना पाहिली की या सर्वांचा त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचे ठरवले तर खूप खूप निराळे चित्र असते. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आपली विचारधारा सोडायची नाही, कितीही, कोणतीही वादळे आली तरी त्याला निधड्या छातीने तोंड द्यायचे, या त्यांच्या बेडर स्वभावामुळे अनेकांनी आपले रस्ते बदलले. पण, त्याचवेळी या स्वभावावर प्रेम करणारे हजारो लोक आज भाईंच्या बरोबर त्यांची ढाल बनून उभे आहेत. म्हणूनच आज वीट आणणाऱ्या राजकीय वातावरणात भाईंसारखा आश्वासक चेहरा आशेचा किरण ठरतो.
राजकारणाप्रमाणे सहकार क्षेत्रातसुद्धा भाईंनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणी कितीही बढाया मारल्या अथवा विरोधासाठी टीका केली, तरी रायगडातील सहकाराचा भाईंना वजा करून विचारच करता येत नाही. भाईंचे वडील स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन भाईंनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. अवसायनात गेलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्यातीलच नव्हे तर, देशातील सर्वोत्तम बँक बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्वोत्तम तंत्रज्ञान, पारदर्शक कारभारामुळे या बँकेने सहकारातील ‌‘सहकरनिष्ठ’, ‌‘सहकारभूषण’, ‌‘सहकारमहर्षी’ अशी अनेक पारितोषिके प्राप्त करून आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. इतकेच नव्हे तर, याच बँकेवर आधारित फिल्म नाबार्डने स्व:खर्चातून बनवून देशभरात प्रसारित केली. राजकारणात सतत विरोधी प्रवाहात राहून ही प्रगती करणे केवळ आश्चर्य मानले जाते; परंतु सकारात्मक विचार, धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती आणि उद्दिष्टपूर्तीसाठी सततचा पाठपुरावा हे सहज साध्य करून देतात.
विविध सहकारी संस्थांचे एकत्रीकरण, त्यांचे संगणकीकरण अशी अनेक कामे भाईंच्या यशस्वी कामांचा वेगळा ठसा उमटवतात. याखेरीजसुद्धा जिल्ह्यातच नव्हे तर, राज्यपातळीवरसुद्धा सहकारात वैविध्यपूर्ण कामे जयंतभाईंनी केली आहेत. रायगड बाजारची स्थापना करून त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये व्यापक ग्राहक चळवळ सुरू केली. अनेक आव्हानांना तोंड देत आजही ग्राहक सेवांबरोबरच गरजूंना रोजगारनिर्मिती करून दिली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य असेच आदर्शवत आहे. एखाद्या विषयात आपले मतभेद झाले तर आपली राजकीय ताकद वापरुन व्यक्तीला किंवा संस्थेला त्रास देणारे अनेक राजकारणी आपण पाहिलेत; परंतु असे नकारात्मक काम करण्यापेक्षा आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र काम करुन समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचे काम भाईंनी करून दाखविले.
प्रभाकर पाटील यांच्या नावाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण करून त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना नवे दालन निर्माण करून दिले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. देशात आज शिक्षण संस्था काढून आपल्या चार पिढ्यांची व्यवस्था करून ठेवणारे असंख्य शिक्षणमहर्षी असताना, आपल्या व्यावसायिक उत्पन्नातील 25 टक्के रक्कम या कामासाठी खर्च करणारे भाईंसारखे क्वचितच पाहायला मिळतात. भाईंच्या बरोबर आता त्यांच्या स्नुषा चित्रलेखाताई या त्यांना विशेष सहकार्य करीत आहेत.
आपण वरील सर्व क्षेत्रातील काम हा एक व्यवसाय समजून त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून राजकारण करणारे अनेक लोक नेहमीच पाहतो. परंतु, स्वतःचा व्यवसाय इमानेइतबारे करुन त्यातून राजकारण करणारे फार कमी नेते आज राज्यात, देशात आहेत. परंतु, भाई जयंत पाटील हे आपले व्यवसाय पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीने करून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून राजकारण, समाजकारण करतात. त्यांचा पोर्टचा व्यवसाय, कॅटमरनचा व्यवसाय हेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरलेत. या व्यवसायासाठी त्यांचे वेगळेपण सिद्ध करून हजारो लोकांना नोकरीची संधी दिली.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे काम आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगायची म्हटली तर प्रत्येक विषयाचा स्वतंत्र प्रबंध बनेल. परंतु, आज आपल्याला शब्दांची मर्यादा आहे, त्यामुळे लेखन आटोपते घ्यावे लागेल. भाई आता वयाची 70 वर्षे पूर्ण करीत आहेत, तसे हे निवृतीकडे झुकणारे वय; परंतु एकंदरीतच आजची राजकीय परिस्थिती, मोठ्या प्रमाणावर होत असणारा निराशावाद, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याची नितांत गरज भाईंना अधिक जोमाने काम करण्यास भाग पडतात. अर्थात, भाई स्वत:हूनच मी आता पन्नाशीच्या उमेदीने काम करणार असे सांगतात आणि नुसते सांगतच नाहीत, तर त्यांनी तरुणांना लाजवेल अशा तडफेने कामाला सुरुवातही केली आहे.
यश-अपयश येते, जाते; पण हाती घेतलेला लोकसेवेचा वसा थांबवता येत नाही, ही शिकवण भाई आपल्या कृतीतून समस्त कार्यकर्त्यांना देत असतात. आणि, म्हणूनच जे लोक भाईंना नीट ओळखत नाहीत, ते कदाचित भाई काळानुरूप बदलत नाहीत, भाई हट्टी आहेत, असे बोलतही असतील; पण जे लोक भाईंना जवळून ओळखतात, भाईंची विचारसरणी समजून घेतात, ते भाईंची दूरदृष्टी आणि आत्मविश्वासाला दाद देतात आणि भाईंना सर्वार्थाने साथ देण्यासाठी कटिबद्ध होतात. अशी सर्व वयोगटातील हजारो लोकांची फौज भाईंचा शब्द प्रमाण मानून त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे. आणि, हेच आहे भाईंचे ऊर्जास्त्रोत, हीच आहे भाईंची ताकद, हीच आहे भाईंची प्रेरणा.
या सर्व लढाईत यश निश्चित आहे. परंतु, त्यासाठी भाईंना शतायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रभूचरणी प्रार्थना आणि आमचे प्रेरणास्थान सन्माननीय जयंतभाईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
प्रदीप कृष्णाजी नाईक
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक लि., अलिबाग-रायगड