मुंबई (प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाच्या परिसरात आज अनपेक्षितपणे हाणामारीचा प्रकार घडला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर परिस्थिती चिघळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विधानभवनासारख्या गंभीर आणि प्रतिष्ठित ठिकाणी अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेची थट्टा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हाणामारीमुळे सुरक्षाव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकाराची जबाबदारी नेमकी कोण घेणार आणि कारवाई कोणावर होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानभवनात ही गुंडगिरी नक्की कोणाची होती, हे स्पष्ट व्हावे अशी मागणी होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून, नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.









