अलिबाग (प्रतिनिधी): रेवदंडा गोळा स्टॉपजवळ आज (दि. १८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मथुरा रामचंद्र वरसोलकर (वय अंदाजे ६५, रा. बोर्ली) असे मृत महिलेचे नाव असून त्या रस्त्यावरून जात असताना स्वारगेटहून मुरुडकडे येणाऱ्या एसटी बसने त्यांना जोराची धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की मथुरा वरसोलकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अपघाताची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बसचालकांच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अशा अपघातांना आळा बसावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.









