अलिबाग (प्रतिनिधी) : गटारी अमावस्या… म्हणजे मजा, पार्टी, मित्रमंडळींसह धमाल करण्याचा दिवस. श्रावणाच्या आधीचा शेवटचा दिवस म्हणून गटारीची उत्सुकता नेहमीच खास असते. पण यंदा महागाईने या उत्साहावर अक्षरशः पाणी फेरलं आहे. जेवणाची चव वाढवणाऱ्या मटण-मासळीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या गटारीचा थाट अडचणीत आला आहे.
मटण, मासळी, चिकन – दर ‘हायफाय’!
गटारीसाठी खास मटण, चिकन किंवा मासळी आणायची परंपरा अनेक घरांमध्ये असते. मात्र यंदा स्थानिक बाजारात मटणाचे दर प्रतिकिलो ₹800 ते ₹900 पर्यंत पोहोचले आहेत. कोळंबी आणि सुरमईसारख्या मासळीचे दर ₹1000 पेक्षा अधिक झालेत. चिकनदेखील ₹200 ते ₹250 किलो दराने विकले जात आहे.
सौम्य पेयांपासून ते दारूपर्यंत सगळंच महाग
फक्त अन्नसामग्रीच नव्हे, तर गटारीसाठी वापरली जाणारी सौम्य पेये – सोडा, थम्सअप, लिम्का यांचे दरही वाढले आहेत. बिअर, वाईन आणि इतर मद्यांचे दरसुद्धा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. परिणामी, “गटारी पार्टी” आयोजित करताना खर्चाचा नीट विचार करावा लागत आहे.
हॉटेल-ढाब्यांनाही महागाईचा फटका
गेल्या काही दिवसांत हॉटेल्स आणि ढाब्यांनीही त्यांच्या मेन्यूमध्ये दरवाढ केली आहे. एका वेळच्या जेवणाचे बिल काही ठिकाणी ₹250 ते ₹300 पर्यंत गेले आहे. त्यामुळे गटारी निमित्त बाहेर जेवणाचा विचार करणाऱ्यांना देखील खिशाकडे पाहून निर्णय घ्यावा लागत आहे.
“गेल्यावर्षी २ किलो मटण घेतलं, यंदा अर्ध्यावर यावं लागलं”
बाजारात खरेदीसाठी आलेल्या अनेक गृहिणी आणि ग्राहक यंदा गटारीच्या तयारीबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. “गेल्यावर्षी २ किलो मटण आणि १ किलो कोळंबी घेतली होती, पण यंदा किंमती पाहून अर्ध्यावर यावं लागलं,” असे अनुभव अनेकजण शेअर करत आहेत.
व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?
“गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्या, मसाले, धान्ये आणि इंधन यांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर झाला आहे,” असं स्थानिक किरकोळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
थोडक्यात काय?
यंदाची गटारी म्हणजे “खिसाला ताण आणि आनंदाला माप” अशी अवस्था झाली आहे. महागाईने गटारीच्या पारंपरिक थाटावर विरजण घातलं, हे मात्र नक्की!