अलिबाग (प्रतिनिधी): आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक माजी राष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू सुरेश गावंड यांचे बुधवारी (दि. २३) निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे.
सुरेश गावंड हे उत्कृष्ट शुटिंगबॉल खेळाडू होते. त्यांनी अनेकवेळा रायगड जिल्हा शुटिंगबॉल संघाचे नेतृत्व केले. आर सी एफ शुटिंगबॉल संघाचे ते १२ वर्ष कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आर सी एफ संघाने १० वर्ष रायगड जिल्हा अजिंक्यपद शुटिंगबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्यांनी २००४ साली संबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. आर सी एफ संघातून सुरेश गावंड दहा अखिलभरतीय शुटिंगबॉल स्पर्धा खेळले. रायगड जिल्हा शुटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. वीसू म्हात्रे यांच्या नंतर सुरेश गावंड यांनी रायगड जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशनच्या सरचिटणीस पदाची जबदारी समर्थपणे सांभाळली.
सुरेश गावंड क्रीडाक्षेत्राबरोबरच सामाजिक आणि सहकार क्षेत्रात कार्यरत होते. मागील आठ वर्ष ते आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक होते.









