अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर भाजी विक्रीविरोधात श्री गणेश भाजी विक्रेते सामाजिक विकास मंडळ यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

या निवेदनात मंडळाने स्पष्ट केले आहे की, बहुतांश भाजी विक्रेते हे अधिकृत परवानाधारक असून, ते नगरपरिषदेच्या अधिकृत भाजी मार्केटमध्ये किंवा विशेष परवानगी असलेल्या ठिकाणीच विक्री करतात. मात्र, काही बाहेरगावाहून आलेले भाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला आणि अन्य अनधिकृत ठिकाणी थेट विक्री करत असून यामुळे अधिकृत विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

मंडळाने यापूर्वीही २२ जुलै २०२४ रोजी चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ‘स्नेहल लॉज’ परिसरातील बेकायदेशीर विक्रीबाबत लेखी तक्रार दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

रस्त्याच्या कडेला होत असलेली अनधिकृत विक्री केवळ अधिकृत विक्रेत्यांचे नुकसान करत नाही, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेला अडथळा, घाण व अस्वच्छता, आणि सार्वजनिक जागेचा अयोग्य वापर असे प्रश्न निर्माण करत आहे. त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अनधिकृत विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी ठाम मागणी मंडळाने केली आहे.
