८९ कोटींचा केटामाईन ड्रग्ज साठा जप्त – महाड एमआयडीसीमध्ये मोठी कारवाई


महाड (प्रतिनिधी): महाड एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक कंपनीवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ८८ कोटी ९२ लाख २५ हजार रुपयांचे केटामाईन हे अमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, एलसीबी, पोलादपूर, महाड शहर पोलीस व अँटी नार्कोटिक्स युनिट, मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

पोलिसांना पोना/२३६६ इक्बाल शेख यांच्यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईस वेग आला. दोन महिन्यांपूर्वीपासून संशयित आरोपी एकमेकांच्या संगनमताने महाड एमआयडीसीतील प्लॉट नं. २६/३ येथील रोहन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बेकायदेशीररीत्या केटामाईन तयार करत होते.

गुन्हा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट कलम ८(c), २२(c), २५, २७(a), २९ व बीएनएस २०२३ चे कलम ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटक केलेले आरोपी :
१) मच्छिंद्र तुकाराम भोसले (रा. जिते, महाड)
२) सुशांत संतोष पाटील (रा. माहोप्रे, महाड)
३) शुभम सदाशिव सुतार (मूळ रा. पाचगाव, कोल्हापूर – सध्या रा. नांगलवाडी, महाड)
४) रोहन प्रभाकर गर्वस (रा. मालाड, मुंबई)

या यशस्वी कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग्ज जप्तींपैकी एक मानला जात आहे.