रायगड (प्रतिनिधी): रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना. अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान रायगड लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सुविधांच्या उन्नतीसाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेमध्ये स्थानिक रेल्वे स्थानकांचा विकास, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा, नवीन रेल्वे थांबे, गाड्यांची संख्या वाढवणे तसेच रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याबाबत मुद्देसूद चर्चा झाली. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अधिक चांगल्या व सुरक्षित रेल्वे सेवा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या पावले उचलावीत, अशी मागणी खासदार तटकरे यांनी केली.
रेल्वे मंत्री वैष्णव यांनीही या बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले. रायगडमधील रेल्वे सेवा सुलभ आणि गतिमान होण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली आहे.