भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याला मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी दुखापत झाली होती. ज्यामध्ये त्याच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले होते. यानंतर, एक अपडेट समोर आले की पंत आता सामन्यात खेळू शकणार नाही.

यादरम्यान, बीसीसीआयने माहिती दिली आहे की, पंत मँचेस्टर स्टेडियमवर पोहोचला आहे आणि संघात सामील झाला आहे. त्याच वेळी, पंत संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करण्यास देखील तयार आहे. म्हणजेच ऋषभ पंत फलंदाजीसाठी उपलब्ध असणार आहे. पण, तो विकेटकीपिंग करणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळेल. मात्र, तो मालिकेतून बाहेर आहे की नाही हे बोर्डाने सांगितलेले नाही. पण फलंदाजीसाठी येईल, ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे.

पहिल्या डावात ऋषभ पंतला कशी झाली दुखापत?
ऋषभ पंत पहिल्या डावात 37 धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा रिव्हर्स स्वीप शॉट खेळताना चेंडू त्याच्या पायाला लागला. भारतीय डावाच्या 68 व्या षटकात ख्रिस वोक्सचा चेंडू त्याच्या उजव्या पायाला लागला. त्यानंतर, खूप वेदना होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याला चालता येत नव्हते. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेत नेण्यात आले. पंतच्या उजव्या पायातून रक्त येत असल्याचे दिसून आले.

मालिकेत पंतला दुखापत होण्याची ‘ही’ दुसरी वेळ
मालिकेत पंतला दुखापत होण्याची ही दुसरी वेळ आहे. लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान विकेटकीपिंग करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो इंग्लंडच्या दुसऱ्या डावात विकेटकीपिंग करू शकला नाही. त्यावेळी ध्रुव जुरेलने पंतच्या जागी विकेटकीपिंग केली होती. या सामन्यातही तो पंतच्या जागी विकेटकीपिंग करताना दिसणार आहे.