अलिबाग (प्रतिनिधी): चोंढी मार्गावरील मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. अखेर (RMC) च्या यंत्रणेने तत्काळ दखल घेत ट्राफिक पोलिसांच्या सहकार्याने सदर खड्डा भरून काढण्यात आला.
यावेळी ट्राफिक पोलिस शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवत कामात मोलाचा सहभाग घेतला. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरु असताना काम करणे हे मोठे आव्हान होते, मात्र पोलिस आणि आरएमसीच्या एकत्रित प्रयत्नांनी हे काम यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमाबद्दल किहीमचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी ट्राफिक पोलिस शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले. “खड्डा भरल्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय वेळेवर घेतल्याने संभाव्य अपघात टळले,” असे गायकवाड म्हणाले.
स्थानिक नागरिकांनीही या कामाचे कौतुक केले असून, अशा प्रकारची तत्काळ कारवाई भविष्यातही अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.









