अलिबाग (प्रतिनिधी): सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी अलिबाग समुद्रकिनारी धिंगाणा घातल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दारूच्या नशेत बेधुंद झालेल्या या पर्यटकांनी इतर पर्यटकांना त्रास दिल्याने अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चौघेजण शनिवार व रविवारच्या सुट्टीसाठी अलिबागमध्ये आले होते. दुपारी समुद्रकिनारी फिरताना त्यांनी मद्यप्राशन केले आणि नंतर तेथील वातावरण बिघडवू लागले. त्यांच्या वागण्यामुळे अन्य पर्यटक त्रस्त झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्या चौघांना आटोक्यात आणले. मात्र, नशेमुळे ते कुणाचेही ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
या प्रकारामुळे पर्यटनस्थळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.