अलिबागेत पोलीसांनी गुटख्‍याचा मोठा साठा पकडला दोघे जेरबंद , लाखोंचा माल जप्‍त


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग पोलीसांनी बेकायदा गुटखा विक्री विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. अलिबाग पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत 1 लाख 16 हजारांचा गुटखा आणि कार मिळून 4 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी दोघा आरोपींना बेडया ठोकल्‍या आहेत. अलिबाग शहरातील हरीष बेकरी समोरील रस्‍त्‍यावर आणि वायशेत इथं केलेल्‍या कारवाईमुळे किरकोळ गुटखा विक्रेत्‍यांमध्‍ये घबराट पसरली आहे.

राज्‍यात गुटखाबंदी असतानाही मोठया प्रमाणाव गुटख्‍याची विक्री बिनबोभाट सुरू आहे. त्‍यावर अंकुश ठेवण्‍यासाठी पोलीसांनी आता मोहीम उघडली आहे. अलिबागमध्‍ये एका कारमधून गुटख्‍याचा मोठा साठा येणार असल्‍याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्‍यानुसार पोलीसांनी पाळत ठेवत हरीष बेकरीसमोर ही कार अडवली. कारची झडती घेतली असता त्‍यात बेकायदा गुटख्‍याचा मोठा साठा आढळून आला. कारमधील नकुलकुमार नंदलाल चौरसीया याला गुटख्यासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 62 हजारांचा विविध प्रकारचा पानमसाला, तंबाखू आणि एक पांढऱ्या रंगाची कार जप्‍त करण्‍यात आली.तपासादरम्यान, नकुल कुमार याने राम केवल रामप्रसाद निशाद (रा. वायशेत, ता. अलिबाग, मूळ रा. उत्तरप्रदेश) याला गुटखा विकल्याचे समोर आले. पोलिसांनी राम केवल निशादच्या वायशेत येथील राहत्या घरावर छापा टाकून, त्याच्या ताब्यातून विविध प्रकारचा पानमसाला, सुगंधित पान मसाला, तंबाखू आणि विशेषतः काळ्या चरस सदृश गोळ्या असा एकूण 54 हजार 591 रूपये किमतीचा माल जप्त केला.

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि अमली पदार्थ, मानवी जीवितास अपायकारक असल्याचे माहीत असूनही, स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.