अलिबाग (प्रतिनिधी): खांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी मासेमारीसाठी गेलेली ‘तुळजाई’ नावाची बोट समुद्रात बुडाल्यापासून हरवलेल्या तीन खलाशांचा शोध अद्याप लागलेला नाही. नरेश शेलार, धीरज कोळी आणि मुकेश पाटील हे तिघे खलाशी अद्याप बेपत्ता असून, रविवारी दिवसभर राबवण्यात आलेल्या युद्धपातळीवरील शोधमोहिमेनंतरही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. समुद्रात अंधार पडल्यानंतर सायंकाळी ही मोहिम तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, सोमवारपासून शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच शनिवारीच संध्याकाळपासून स्थानिक आपत्ती निवारण यंत्रणा, तटरक्षक दल, पोलीस विभाग, सह्याद्री रेस्क्यू टीम आणि स्थानिक मच्छीमारांची मदत घेऊन व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली. रविवारी सकाळपासून मांडवा ते रेवदंडा किनाऱ्यापर्यंत समुद्र किनारी पिंजून काढण्यात आला. हॅलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने हवाई निरीक्षण तर करण्यात आलंच, शिवाय पुणे येथून मागवण्यात आलेल्या थर्मल सेन्सर ड्रोनच्या मदतीने पाण्याखालचा भाग शोधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पावसाचा जोर, समुद्रातील लाटांचा रौद्र अवतार आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शोधकार्याला अनेक अडचणी आल्या.
बचावलेले खलाशी सांगतात की, बेपत्ता असलेले तिघेही बोटीच्या खालच्या भागात झोपलेले होते. त्यामुळे बोट उलटल्यावर त्यांना वर यायला वेळ मिळालाच नाही आणि ते थेट समुद्रतळाशी गेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत अधिक तपास सुरू आहे.
शनिवारी सकाळी उरण तालुक्यातील करंजा बंदरातून सकाळी ७ वाजता मासेमारीसाठी ही बोट निघाली होती. सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात लाटांचा जोर वाढल्याने बोट उलटली. सुदैवाने, बोटीत असलेल्या आठ खलाशांपैकी पाच जणांनी समुद्रात पोहत सासवण किनारा गाठला आणि जीव वाचवला. हेमंत गावंड (वय ४५), संदीप कोळी (वय ३८), रोशन कोळी (वय ३९), शंकर भोईर (वय ६४) आणि कृष्णा भोईर (वय ५५) अशी वाचलेल्यांची नावे असून, यांना तत्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यापैकी रोशन कोळी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना आणि आणखी दोन जखमींना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींना किरकोळ दुखापती असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, हरवलेल्या तिघा खलाशांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, समुद्रकाठावर त्यांची हताशपणे वाट पाहत असलेली दृश्यं हृदयद्रावक होती. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत आणि शोध कार्य सुरू असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. सोमवारपासून नव्याने अधिक व्यापक आणि तांत्रिक साधनांच्या साहाय्याने शोध मोहीम पुन्हा राबवली जाणार आहे.