पनवेलमध्ये शेकापचा ७८ वा वर्धापन दिन; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थित


अलिबाग (प्रतिनिधी): शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) ७८ वा वर्धापन दिन यंदा पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होणार आहे. शनिवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नवीन पनवेल येथील भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या वर्धापन दिन मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती. त्यांच्या भाषणातून राजकीय दिशा व आगामी निवडणुकांचा संदर्भ कार्यकर्त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांची शेकापच्या व्यासपीठावर उपस्थिती ही सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या कार्यक्रमात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख आणि प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस अ‍ॅड. गौतम पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते व नवयुवक सदस्य मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

या वर्धापन दिनासाठी शेकापने गावागावात तसेच शहरी भागात कार्यकर्त्यांच्या बैठकींचे आयोजन केले आहे. या बैठकींना चांगला प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांची, युवांची आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची तयारीही जोमात सुरू आहे. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांच्या विविध टीम्स तयार करण्यात आल्या असून, वाहतूक, राहणे, भोजन आणि व्यासपीठ व्यवस्थापनासाठी नियोजन आखले गेले आहे.

या मेळाव्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीची दिशा स्पष्ट होणार असून, पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. महिला, युवक, कामगार आघाडींसह सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

मेळावा शांततेत, शिस्तबद्धपणे आणि जनसंपर्क साधणाऱ्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार शेकापच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे शेकापच्या वर्धापन दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, राज्याच्या राजकीय वर्तुळातही या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.