खांदेरीजवळील ‘तुळजाई’ बोट दुर्घटना: तिन्ही बेपत्ता मच्छीमारांचा दुर्दैवी अंत 


नरेश राम शेलार, धीरज कोळी व मुकेश यशवंत पाटील यांचा मृत्यू
अलिबागमधील सासवणे व किहीम किनारा परिसरात सापडले शव
कुटुंबाला शोक अनावर; उरणमध्ये हळहळ तर मच्छीमारांमध्ये भीती
अलिबाग (प्रतिनिधी): उरण तालुक्यातील करंजा येथून मच्छीमारीसाठी निघालेली ‘तुळजाई’ नावाची बोट खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात उलटल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ५ मच्छिमार कित्येक तास पाण्यात पोहून किनाऱ्यावर आल्याने बचावले होते मात्र यातील ३ मच्छिमार बेपत्ता झाले होते. त्यांचे शोधकार्य गेली २  दिवस अविरत चालू होते. अखेर बेपत्ता मच्छीमार सापडल्याची माहिती मिळत आहे.
तुळजाई बोट ही मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची असून, ती सकाळी सुमारे ७ वाजता करंजा बंदरातून समुद्रात मच्छीमारीसाठी निघाली होती. मात्र सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ बोट उलटली. बोटीत एकूण ८ जण होते. त्यापैकी ५ जण सुखरूप किनाऱ्यावर आले असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत नरेश राम शेलार, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील हे तिघे बेपत्ता होते. सलग २ दिवस ड्रोनच्या माध्यमातून बेपत्ता तिघांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. अखेर या तिघांचे शव अलिबागमधील सासवणे आणि किहीम किनाऱ्याच्या परिसरात सापडल्याचे प्राथमिक वृत्त मिळत आहे.
या घटनेनंतर पोलीस विभाग, स्थानिक प्रशासन, आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून तातडीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले होते. यामध्ये ड्रोन कॅमेराने महत्वाची भूमिका बजावली. मात्र तिन्ही मच्छिमार मृत स्वरूपात सापडल्याने बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांवर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेमुळे उरण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.