अलिबाग (प्रतिनिधी): कोकणातील पावसाळी हंगामात कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी पारंपरिक कुस्ती स्पर्धा येत्या २९ जुलै २०२५ रोजी, मंगलवारी अलिबागमध्ये भरणार आहे. महावीर ग्रामस्थ मंडळ, खंडाळे अलिबाग यांच्या वतीने आणि नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दुपारी २ वाजता सुरू होणार असून, त्यामध्ये रायगड व परिसरातील अनेक नामवंत मल्ल आपली ताकद आणि कुशलता पणाला लावणार आहेत. नवोदित मल्लांसाठीही हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. यामुळे परिसरातील कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या उपक्रमास रायगड जिल्हा कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष श्री. जयेंद्र काशिनाथ भगत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रेरणेतूनच या स्पर्धेची रूपरेषा उभारण्यात आली आहे.

वस्ताद, नवखे मल्ल, पंच आणि खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच कुस्तीप्रेमींनी कोकणातील मातीतली पारंपरिक कुस्ती अनुभवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.
कोकणातील कुस्ती परंपरेचा गौरव वृद्धिंगत करणाऱ्या या भव्य आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, अलिबागमध्ये कुस्तीचा जल्लोष अनुभवण्यास सज्ज राहा!