रायगडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; दोन केंद्रांचे परवाने निलंबित


रायगड (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत रासायनिक खतांचा अद्यावत साठा ठेवणे, कमाल दरापेक्षा जास्त किमतीत विक्री न करणे, शेतकऱ्यांना एम-फॉर्ममध्ये पावत्या देणे, तसेच अनुदानित खताची विक्री केवळ पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र, या अटींचा भंग दीपा कृषी सेवा केंद्र (पनवेल) व भूषण कृषी सेवा केंद्र (पोयनाड) यांनी केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

साठा रजिस्टर, पॉस मशीन व प्रत्यक्ष साठ्यामध्ये विसंगती, बिलामध्ये आवश्यक तपशीलांचा अभाव, शेतकऱ्यांना योग्य पावत्या न देणे, तसेच कमाल दरापेक्षा जास्त दराने खत विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले.

या पार्श्वभूमीवर दोन्ही केंद्रांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, इतर केंद्रांचीही काटेकोर तपासणी सुरू आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.