अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांना ‘पंचायत राज विकास मंच – अखिल भारतीय सरपंच परिषद’ यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात महिलांनी यशस्वी नेतृत्व करून गावाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची ही सकारात्मक नोंद ठरली आहे.
हा पुरस्कार नागपूर येथे झालेल्या विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यभरातील विविध मान्यवर सरपंच व पंचायतराज क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकृत करताना सरपंच हर्षदा मयेकर म्हणाल्या, “हा सन्मान माझ्या नागाव गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा आहे. त्यांचे प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद हेच माझं खऱ्या अर्थाने बळ आहे.” त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करत, आपल्या ग्रामपंचायत टीमचे, सर्व सदस्यांचे, ग्रामविकास अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
“तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हतं,” असे त्या भावनिक स्वरात म्हणाल्या. यावेळी त्यांनी आपल्या पती निखिल मयेकर यांचा विशेष उल्लेख करत, “तुमचं आधार, समजून घेणं आणि सातत्याने दिलेला पाठिंबा हेच माझ्या कार्यप्रवासाचे खरे बळ आहे,” असे नमूद केले.
पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी अखिल भारतीय सरपंच परिषद आणि किरण भगत यांचे मनःपूर्वक आभार मानले. “हा सन्मान ग्रामीण भागातील सेवा कार्यातील माझी बांधिलकी अधिक दृढ करतो,” असे सांगत त्यांनी आगामी काळात गावाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.