खांदेरी बोट दुर्घटनेनंतर बंदी काळातील अवैध मासेमारीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर


अलिबाग (प्रतिनिधी): खांदेरी समुद्रकिनारी अलीकडेच घडलेल्या बोट दुर्घटनेत तिघा मच्छीमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पाच जणांना थोडक्यात जीवदान मिळाले. या घटनेमुळे पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीतही सुरु असलेल्या बेकायदेशीर मासेमारीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. या दुर्घटनेनंतर बंदीच्या आदेशांना धाब्यावर बसवणाऱ्या मासेमारांबरोबरच, यंत्रणांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोकण किनारपट्टीवर दरवर्षी १ जून ते ३१ जुलै दरम्यान यांत्रिक मासेमारीवर बंदी लागू केली जाते. या काळात समुद्र खवळलेला असतो, वादळी वारे वाहतात आणि मास्यांच्या प्रजननाचा कालावधी असल्याने ही बंदी अत्यंत आवश्यक मानली जाते. या काळात स्थानिक मच्छीमार संघटनांपासून पोलीस, मत्स्य व्यवसाय विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार सुचना आणि आवाहने करण्यात येतात.
मात्र यावर्षीही काही मासेमारी बोटी बंदीची नियमावली धुडकावून छुप्या मार्गाने समुद्रात उतरत असल्याचे उघड झाले आहे. खांदेरी येथे घडलेली दुर्घटना ही अशाच प्रकारच्या बेकायदेशीर मासेमारीमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे शासनाचे आदेश, सुरक्षेच्या उपाययोजना आणि यंत्रणांचे नियंत्रण यांची गंभीरपणे झडती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मासेमारी बंदीच्या काळात समुद्रात उतरलेल्या बोटी कोणत्या मार्गाने जातात? त्या कोणाच्या संमतीने कार्यरत असतात? आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती यंत्रणा जबाबदार आहे? हे प्रश्न आता प्रशासनासमोर आहेत.
या पार्श्वभूमीवर, बंदी कालावधीत होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व मच्छीमार संघटनांकडून व्यक्त होत आहे. फक्त आवाहन आणि सूचना पुरेशा नाहीत, तर तात्काळ कारवाई आणि कठोर पथकांची नेमणूक हाच एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट संकेत ही दुर्घटना देते.