बेकायदा मासेमारी बेतली जीवावर; बोट दुर्घटनेने अनेक सवाल उपस्थित
रायगड (खास प्रतिनिधी): शनिवारी दिनांक २६ जुलैच्या सकाळी साडे ७ वाजता उरण तालुक्यातील करंजा बंदरातून निघालेली ‘तुळजाई’ नावाची मच्छीमार बोट केवळ एक तासातच समुद्राच्या कवेत गेली. खांदेरी किल्ल्याजवळ भरतीच्या प्रचंड लाटा उसळल्या आणि बोटीचे दोन तुकडे होऊन तीला जलसमाधी मिळाली. या वेळी बोटीवर एकूण ८ खलाशी होते. त्यातील ५ जण डेकवर जागे होते, तर तिघे जण बोटीच्या केबिनमध्ये होते. लाटांच्या एका तडाख्यानंतर बोट तुटली.
डेकवरील ५ जणांनी समुद्रात उड्या घेतल्या. कोणी पाण्याच्या बाटलीचा आधार घेतला, तर कोणी बोटीतील इतर वस्तूंचा आधार घेत अनेक तास लाटांशी झुंज देत जिवंत राहिले आणि किनाऱ्यावर आले. तरीही, केबिनमध्ये अडकलेले तीन खलाशी नरेश राम शेलार, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील खवळलेल्या समुद्राच्या कवेत अडकले. ते बाहेर येण्याआधीच बोटीचा भाग समुद्रात गडप झाला. या तिघांना बोटींसोबतच जलसमाधी मिळाली. त्यांचे शव शोधपथकाने अविरत प्रयत्न करून समुद्राबाहेर काढले.
या दुर्घटनेनंतर तुळजाई बोटीचा एक तुकडा सासवणे किनाऱ्यावर वाहून आला आणि खडकांवर अडकला आहे. बोटीची जी अवस्था झाली आहे, ती पाहून या खलाश्यांसोबत काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. खवळलेल्या समुद्रात बोटीची अवस्था अशाप्रकारची झाली असेल तर खलाशांवर किती मोठे संकट आले असेल याबाबतची कल्पना येते. मच्छिमारांना दरदरून घाम फोडणारेच दृश्य या बोटीचे दिसत आहे.
या घटनेनंतर एक मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मासेमारी बंदीच्या काळातही बोटी समुद्रात का जात आहेत? १ जून ते ३१ जुलै हा काळ मासेमारीसाठी प्रतिबंधित असतो. समुद्र खवळलेला, मासे प्रजननावस्थेत असतात, हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला असतो. तरीही तुळजाई बोट समुद्रात का गेली ? कोणती यंत्रणा याला परवानगी देते? कोण दुर्लक्ष करतं? आणि कोणाचे हात यात ओले झाले आहेत? या सगळ्याचा आता गंभीरपणे शोध घेतला जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत स्थानिक मच्छीमार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. ‘बंदी काळात बेकायदेशीर मासेमारी थांबवा, असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा… नाहीतर अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा घडतील, असा गर्भित इशाराच प्रशासनाला देण्यात आला आहे.









