अलिबाग (प्रतिनिधी): सारळपुल ते कार्लेखिंड या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः रिक्षा, दुचाकी आणि शालेय वाहनांच्या वाहतुकीवर या खड्ड्यांचा गंभीर परिणाम होत होता. अनेक वेळा अपघातांची शक्यता निर्माण होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या डागडुजीची मागणी सातत्याने केली जात होती.
ही गरज लक्षात घेऊन अद्य नाईक प्रतिष्ठान आणि सारळपुल ते कार्लेखिंड रिक्षा संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून आणि अमितदादा नाईक मित्र मंडळ यांच्या स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. एकात्मिक सहकार्याच्या माध्यमातून रस्त्यावर RMC व साहित्य टाकून खड्डे भरले गेले.
या कामासाठी स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय ठरला. कोणत्याही शासकीय निधीशिवाय केवळ सामाजिक उत्तरदायित्वातून उचललेले हे पाऊल परिसरातील नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक आणि उपयोगी ठरले आहे.
या उपक्रमामुळे आता या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून, अपघातांचा धोका कमी झाला आहे. नागरिकांनी या सामाजिक कार्याचे मनापासून स्वागत करत पुढेही अशाच उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक पातळीवरून उचललेला हा उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा ठरत असून, सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेण्याचा आदर्श या माध्यमातून समोर आला आहे.