शहीद निलेश तुणतुणे यांचा २७ वा स्मृतीदिन गावात अभिमानाने साजरा


अलिबाग (प्रतिनिधी): भारतमातेचे वीर सुपुत्र शहीद निलेश तुणतुणे यांच्या २७ व्या स्मृतीदिनानिमित्त गावात अभिमानपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांना गावकरी व शहीद परिवारासोबत उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.

कार्यक्रमादरम्यान शहीद निलेश तुणतुणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली. पोलीस विभागाच्या वतीने शासकीय सन्मानाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून वातावरण देशप्रेमाने भारून टाकले.

गावकऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या त्यागातून “राष्ट्रासाठी झिजणं हाच खरा अभिमान” हे शिकवण मिळते, असा संदेश उपस्थितांनी दिला.

या वेळी गावातील युवकांना शहीद निलेश तुणतुणे यांच्या प्रेरणेतून कार्यरत होण्याचे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आधारवड ठरण्याचे आवाहन करण्यात आले. समाजात एकतेचा संदेश पसरवणे हीच शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे वक्तव्य सरपंच हर्षदा मयेकर यांनी केले.

शहीद निलेश तुणतुणे यांचे बलिदान गावाच्या आणि राष्ट्राच्या हृदयात सदैव जागृत राहील, ही भावना उपस्थितांनी व्यक्त केली.