खरबाची वाडी ग्रामस्थांची माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्याशी भेट, विविध विकास कामांबाबत चर्चा


रोहा (प्रतिनिधी): ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली अंतर्गत येणाऱ्या आतोणे येथील खरबाची वाडी ग्रामस्थांनी आज माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन गावातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांनी आपल्या परिसरातील समस्या, गरजा व अपेक्षांबाबत थेट माजी आमदारांशी संवाद साधत सकारात्मक प्रतिसाद मिळवला.

या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी पायाभूत सुविधा जसे की अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, वीज सुविधा, सार्वजनिक बांधकामे यावर भर देण्याची मागणी केली. तसेच शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा यासाठी मार्गदर्शन मिळावे, अशी विनंतीही केली. माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी ग्रामस्थांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले व संबंधित विभागाशी तात्काळ संपर्क साधून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते नाना शिंदे, नारायण शिंदे, भास्कर चोरगे, बिनधास्त धनावडे, देवजी सावंत, गंगाराम काटकर यांच्यासह खरबाची वाडी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या सकारात्मक संवादाबद्दल समाधान व्यक्त केले आणि माजी आमदार पाटील यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारची थेट चर्चा आणि लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद ही विकास प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.