अलिबाग (विशेष प्रतिनिधी): विधानसभेचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र ऍड, प्रवीण ठाकूर आणि रवींद्र ठाकूर यांनी काँग्रेसने दिलेला हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे घड्याळ आपल्या हातात बांधले. प्रवीण ठाकूर यांच्या शेकडो समर्थकांनी पक्ष प्रवेशाला आपली उपस्थिती दाखवून माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या सुपुत्रांच्या निर्णयाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. अलिबाग नगरपालिका परिसर, बेलोशी जिल्हा परिषद मतदार संघ , मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघ, मानकुळे ग्रामपंचायत , धोकवडे ग्रामपंचायत मधील सदस्य आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अलिबागनगरीत असणाऱ्या होरीझोन सभागृहात पक्ष प्रवेशाचा जाहीर सोहळा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणारा पक्ष प्रवेशाचा सोहळा तब्बल सव्वातास उशिराने सुरू झाला. पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागले होते. 

यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , रायगडाचे खासदार सुनील तटकरे , महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे , माजी आमदार अनिकेत तटकरे, अशोक भोपतराव, ऍड. राजीव साबळे, उमा मुंढे, मंगेश दांडेकर, मनोज भगत, कृषिकांत भगत , आशिष भट , जयेंद्र भगत, अमित नाईक, चारुहास मगर, मधुकर पाटील, हर्षल पाटील, सुभाष केकाणे, मनोज शिर्के , आरती मोकल, मेघना भोईर, फिरोज घलटे आदी पदाधिकारी उपस्थित होते . 

माझ्या वडिलांच्या कार्यमुळे आमची ओळख आहे. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही जनतेचे काम करतोय. माझा कोणतंही स्वार्थ नाही आपली नाळ जनतेबरोबर जोडलेली आहे. आमची जनता शोषित आहे. अलिबाग पर्यटन स्थळ असतानाही रस्ते आरोग्य, पाणी आदी सुविधांसाठी झटावे लागते आहे. जनतेची जबाबदारी असल्याने त्यांच्या विकासासाठी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आलो आहोत.जनतेसाठी राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे. शाहू, फुले आंबेडकरांची विचारधारा असणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. आमच्या नेत्यांना कोणी वाईट बोलेल तर गाठ आमच्याशी आहे असा ऍड. प्रवीण ठाकूर यांनी नाव न घेता आमदार महेंद्र दळवी यांना इशारा दिला.

जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तीन वेळा अविश्वासाचा ठराव आणण्यात आला. अलिबाग हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. राजकारणात निवडणुकांमध्ये मतभेद झाले असतील पण मनभेद कधी झाले नाहीत. जनमानसामध्ये असणाऱ्या व्यथा सोडविण्याची मागणी प्रवीण ठाकूर यांनी मांडली. राज्यात राजकीय परिस्थिती बदलली आहे. परंतु राजकीय विश्वासार्हता अजित दादांची सर्वाधिक आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोन्याचे दिवस आले आहेत. विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणारे नेतृत्व पक्षात सामील होत आहेत. अलिबाग मतदार संघात माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र प्रवीण ठाकूर यांची न्यायालयात युक्तिवाद करण्याची क्षमता अधिक आहे. आता राष्ट्रवादी पक्षासाठी त्यांनी युक्तिवाद करायचा आहे.असा आशावाद खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

राज्याच्या राजकारणातील राजकीय परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. आशा परिस्थितीमध्ये जनतेच्या विकासासाठी भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. मी शब्दाचा पक्का आहे. गेलेली वेळ परत येत नाही मिळालेल्या वेळेतच कामांची पूर्तता व्हायला हवी. अलिबागचे मेडिकल कॉलेज एक हजार कोटी रुपये खर्च करून सुरू केले आहे. रेवस रेड्डी सागरी महामार्ग लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून कोकणातील पर्यटनवाढीला चालना मिळेल. कोकणातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी जातीचा नाही तर समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करतो. आम्ही बेरजेचे राजकारण करतो. कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नसते जनतेचा विश्वास जिंकायचा असतो. लहान चूक राज्यकर्त्यांना भारी पडल्याचा इतिहास या देशाने अनुभवला आहे. असे अजितदादा पवार म्हणाले
मुंबई गोवा महामार्गाला कोणती साडेसाती लागली आहे.हेच समजत नाही. कंत्राटदार भेटतात परंतु महामार्ग अद्यापही झालेला नाही. हा महामार्ग अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठीची जबाबदारी सरकारकडून स्वीकारली जाणार आहे. माझी काम काण्याची पद्धत वेगळी आहे. मी कडक आहे हे निश्चित सत्य आहे. राष्ट्रवादी पक्ष सामाजिक सलोखा राखून काम करीत आला आहे. कारण नसताना कोणालाही अंगावर घेत नाही आमच्या अंगावर आल्यास आम्ही त्यांना सोडत नाही. कायद्याच्या चाकोरीत राहून त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज राहतो. प्रवीण ठाकूर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी सज्ज रहायला हवे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कमला लागावे असे आवाहन अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.