नवी मुंबईत पालिका कर्मचाऱ्यावर हिंदी बोलण्यासाठी अरेरावी
मुस्लिम महिलेचा मराठीत बोलण्यास नकार; सहकाऱ्याची दादागिरी
भाषिक वादातून नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा गदारोळ
नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी): पनवेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठसकेबाज भाषणातून मराठी भाषेचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यानंतर नवी मुंबईतून मराठीला विरोध दर्शवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ नवी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील असल्याचे बोलले जात आहे. 

समोर आलेल्या व्हिडिओत दिसतेय की, जन्म-मृत्यू नोंदणी विभागात एका मुस्लिम महिलेला तेथील कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्यास सांगितले. यावर महिलेने संताप व्यक्त केला आणि आपल्याला हिंदी बोलण्याचा अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. पुढे महिलेने तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीला बोलावले. संबंधित व्यक्तीने कर्मचाऱ्याला उद्देशून, “तुम्हाला मराठी बोला असा GR आलाय का? पगार घेऊन राजकारण करता का? असं करायचं असेल तर राजकारण करा आणि नोकरी सोडा,” असे अरेरावीचे वक्तव्य केले. यासोबतच कर्मच्रायावर हिंदीत बोलण्यासाठी दबाव टाकला. त्याच्या या उद्धट वागणुकीमुळे ऑफिसमध्ये गदारोळ निर्माण झाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत केले आणि हिंदीत माफी मागत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे काही महत्त्वाचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. मराठी भाषेचा अपमान सार्वजनिक कार्यालयात सहन करावा का? महाराष्ट्रात, विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य का ठरू नये? मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी जनतेशी संवाद साधताना मराठीतच बोलणे अपेक्षित आहे. हे केवळ भाषेचे नव्हे तर राज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला गेला तर त्यात चूक ते काय ? असे संतप्त प्रश्न यावेळी सुज्ञ मराठी नागरिकांमार्फत विचारले जात आहेत.