राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमध्ये तुफान राडा; लेडीज बार फोडले ! मनसे प्रवक्ते योगेश चिलेसह १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल


रायगड (खास प्रतिनिधी): शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत, जिथे बार बंद असावेत अशी अपेक्षा, तिथे अनधिकृत डान्सबार कसे सुरू राहतात, असा थेट सवाल त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. राज ठाकरे यांनी इशारा देऊन दहा तास उलटत नाही तेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या लेडीज बरोबर हल्लाबोल सुरू केला. “विकास होत असतानाही राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्यास संपूर्ण जिल्हाच बरबाद होतो. रायगड जिल्हा सध्या अशाच स्थितीकडे वाटचाल करत आहे,” असे गंभीर निरीक्षणही त्यांनी नोंदवले. ठाकरेंच्या या भाषणाचा परिणाम काही तासांतच दिसून आला. शनिवारी मध्यरात्री १२ वाजता, मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील कोन गावातील नाईट रायडर हा लेडीज सर्व्हस बारवर धडक दिली, हातामध्ये काट्या व दांडके घेऊन मनसेच्या संतापलेल्या सैनिकांनी हा बार फोडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या अगदी काही अंतरावर हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे या कारवाईमुळे उघडकीस आले. ही कारवाई केवळ अनधिकृत बारवर रोष व्यक्त करणारी नव्हे, तर बार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचा धक्कादायक प्रकारही यातून स्पष्ट झाला आहे. यानंतर १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसे प्रवक्ते योगेश चिले यांच्यासह १५ मनसैनिकांवर हे गुन्हे दाखल झाल्याचे समजते.