पाली-सरसगड किल्ल्यावरून ट्रेकर थेट खोल दरीत कोसळला


सह्याद्री संस्थेचे बचावकार्य; हिंदुजा रुग्णालयात जीवन-मरणाशी झुंज सुरु

 रायगड (खास प्रतिनिधी):  सुधागड पालीतील सरसगड किल्ल्यावरून घसरून पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली. निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे व सध्या पुणे येथे नोकरी करत आहे. ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपसोबत तो सरसगड किल्ल्यावर आला होता. गड उतरत असताना तिसऱ्या पायरीवरून त्याचा तोल जाऊन तो दरीत कोसळला. त्या पायऱ्यांवर शेवाळ असल्यामुळे त्या घसरड्या झाल्या होत्या. यामध्ये निखिलच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून डोक्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता. तसेच खांद्याला फ्रॅक्चर झाला असून मानेलाही खोल जखम झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य, स्थानिक आपदामित्र, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक उपचार केल्यानंतर निखिलला किल्ल्यावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार करण्यात आले. परिस्थितीच्या गांभीर्यामुळे त्याला तातडीने कामोठे पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर रविवारी (ता. 3 ऑगस्ट) सकाळी पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निखिलने गंभीर अवस्थेत असूनही प्रसंगी बचाव पथकाला सहकार्य केले, यामुळे बचावकार्य सुलभ झाले. दरम्यान, पर्यटक गडावर अनेक वेळा निष्काळजीपणाने वागताना दिसतात, आणि हे वर्तन त्यांच्या तसेच इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण करते. धोकादायक ठिकाणी फोटोशूट किंवा सेल्फी घेणे, कड्यावर, दरीच्या टोकाला, किंवा रेलिंग नसलेल्या जागी उभे राहून सेल्फी घेणे. इन्स्टाग्रामसाठी थरारक फोटो मिळवण्याच्या नादात जीव धोक्यात घालणे. त्यामुळे पावसाळी सहलीला जाताना सुरक्षा साधनांचा वापर आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता अधोरेखित होत आहे.