गणेशोत्सव तोंडावर; प्लास्टिक फुलांवर बंदीमुळे व्यापाऱ्यांची कोंडी, शेतकऱ्यांना दिलासा


रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, राज्य सरकारने प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने कृत्रिम फुलांच्या व्यवसायिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बाजारात बहर येण्याआधीच हा व्यवसाय कोमेजण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे. तर गणेश भक्तांसमोर आरास करण्यासाठी पर्याय कोणता, असा प्रश्न उभा राहिला आहे.

यापूर्वीच थर्माकोलच्या सजावटीच्या साहित्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर प्लास्टिक फुलांचा वापर वाढला होता. गणेशोत्सवाच्या काळात या फुलांना मोठी मागणी असते आणि यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. मात्र फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नुकतीच कृत्रिम प्लास्टिक फुलांवर बंदीची घोषणा केल्याने अनेक व्यापारी अडचणीत आले आहेत.

गणेशोत्सव जवळ येत असल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक फुलांचा साठा केला होता. विक्रीसाठी साजेसा मालही बाजारात दाखल झाला होता. मात्र आता या मालाचे काय करायचे, असा पेच व्यापाऱ्यांसमोर उभा आहे.

दरम्यान, प्लास्टिक फुलांच्या अतिवापरामुळे खऱ्या फुलांची मागणी कमी झाली होती. परिणामी, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. फुलांचा जवळपास अडीच ते तीन हजार कोटींचा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

⟶ हा निर्णय पर्यावरण पूरक असला, तरी याची अंमलबजावणी करताना व्यवसायिकांच्या नुकसानीची भरपाई आणि शाश्वत पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.