नेरळ तलावात ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?


मुंबई (प्रतिनिधी): नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील तलावात रविवारी (३ ऑगस्ट) दुपारी ८५ वर्षीय जनार्दन गायकवाड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात तलावात एक शव तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने नेरळ पोलीस ठाण्यात माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश ईरमाले व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्तीची ओळख राजबाग बिल्डिंग नं. १२ येथील रहिवासी जनार्दन गायकवाड (वय ८५) अशी झाली आहे. त्यांच्या अंगावर ‘चिक्की’ असे लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे.

प्राथमिक तपासात ही आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह विच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.