रायगड (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील नागाव येथे डॉ. सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हातावर नारळ फोडी आणि गडगडी नारळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागाव समुद्रकिनारी पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत रायगडसह मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, गोवा व कोकणातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
नारळ फोडी स्पर्धेत ४८ तर गडगडी नारळ स्पर्धेत २४ स्पर्धक सहभागी झाले होते. अतिशय अटीतटीच्या लढतीत संजय घरत व सतीश आचरेकर यांनी नारळ फोडी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गडगडी नारळ स्पर्धेत ग्रंथ नाखवाने प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कोकणातील जीवनशैलीशी नाते असलेला हा पारंपरिक खेळ नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला खेळला जातो. नारळ हे येथील संस्कृतीचा आणि व्यवसायाचा अविभाज्य भाग असून या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील वर्षी ही स्पर्धा डे-नाईट स्वरूपात घेण्यात येणार असून महिलांनाही संधी देण्यात येईल, अशी माहिती डॉ. सचिन राऊळ यांनी दिली. त्यांनी नारळ फोडी स्पर्धेला ऑलम्पिकमध्ये समाविष्ट करण्याचीही मागणी करत कोकणकरांनी यात बाजी मारण्याची खात्री व्यक्त केली.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक रोहित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. आमदार महेंद्र दळवी, भाजप महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील, अँड. आस्वाद पाटील, सवाई पाटील व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या यशस्वी स्पर्धेसाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.