अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-रेवस मार्गावर वरसोली फाट्यानजीक मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास एका मानसिक असंतुलित व्यक्तीकडून वाहनांवर व घरांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं.
सदर इसमाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, तसेच काही घरांवरही दगडफेक केली. या घटनेनंतर संबंधित वाहनमालकांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या.
दुपारच्या सुमारास चोंढी पुलाजवळ पिंट्या गायकवाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला पकडून मांडवा सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तत्काळ त्याची चौकशी केली असता तो इसम परप्रांतीय असून बेवारस मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित कारवाई करत त्या इसमाला कर्जत येथील ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ या मानसिक रुग्णांच्या सुधारगृहात दाखल केले. यासाठी किहीमचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी महत्त्वाचे सहकार्य करत मित्रमंडळाची रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली.
या घटनेमुळे निर्माण झालेली भीती निवळताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.