अलिबाग (प्रतिनिधी) : गोपाळकाला सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, अलिबाग शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासोबतच अनुचित प्रकारांना वेळीच लगाम घालण्यासाठी मंगळवारी सायंकाळी अलिबाग पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर रूट मार्च करत सडेतोड शक्तिप्रदर्शन केले.
सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या रूट मार्चचे नेतृत्व अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले. त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. रूट मार्च शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक परिसर, महावीर चौक आणि इतर वर्दळीच्या भागांतून मार्गक्रमण करत पार पडला.
पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी यावेळी सांगितले, “गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला हे सण अलिबागमध्ये मोठ्या उत्साहात साजरे होतात. विशेषतः दहीहंडी स्पर्धेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही गय केली जाणार नाही.”
या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की, कायद्याच्या अधीन राहून सण साजरे करावेत. अनधिकृत किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृतींना पोलिसांकडून थारा दिला जाणार नाही.
शहरातील नागरिकांनीही पोलिसांच्या या सज्जतेचे स्वागत केले असून, सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.