हातोंड, गोंदाव व माठळ गावामध्ये घातलेल्या सशस्त्र दरोड्याचा पर्दाफाश

oplus_0

१० पोलीस पथकांनी ६ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; १ फरार
दरोडेखोरांपैकी अनेक जण स्थानिक गावातील युवक
 रायगड (खास प्रतिनिधी): दि. २७ जुलैच्या मध्यरात्री सुधागड – पाली पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या हातोंड, गोंदाव व माठळ या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. या धक्कादायक घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. पोलीस अधीक्षक दलाल यांनी पोलिसांची १० विशेष पथके तातडीने तैनात करत तपासाची सूत्रे स्वतः हातात . प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदाऱ्या देत गुन्ह्याची उकल करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले. रोज पथकांच्या कामाचा आढावा अंचल दलाल यांच्यामार्फत घेतला जात होता.
या सर्व तपासात पोलीस पथकांनी तब्बल 8 ते 9 दिवस अहोरात्र परिश्रम घेतले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक मदतीच्या आधारे शेवटी या थरारक गुन्ह्यामागील सुत्रधारांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. यावेळी १० पथकांमार्फत समन्वयाने ताब्यात घेतलेले आरोपी अजय एकनाथ चव्हाण (वय 23, रा. आसरे, खालापूर), आकाश पंजाबराव चव्हाण (वय 20, रा. होराळे, खालापूर), सुनिल प्रकाश चव्हाण (वय 32, रा. भिल्लार वाडी, कर्जत), मल्हारी भानुदास चव्हाण (वय 30, रा. भिलवली, खालापूर), सोमनाथ भानुदास चव्हाण (वय 30, रा. भिलवली, खालापूर) आणि सुजल महेश चव्हाण (वय 19, रा. यशवंत नगर, खोपोली) यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोड्यांची कबुली दिली आहे.
या आरोपींपैकी एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. फरार आरोपी हा टाटा एस या वाहनातून भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, हा व्यवसाय केवळ एक बहाणा होता. भाजी विक्री करताना तो गावातल्या घरांची रेकी करायचा. कुठल्या घरात वयोवृद्ध महिला एकट्या राहतात, कोणाच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत याची माहिती मिळवून त्याच्यावरून संपूर्ण टोळी एकत्र येऊन दरोड्याचा कट रचायची.
या टोळीने प्राथमिक चौकशीत ठाणे ग्रामीणमधील मुरबाड आणि टेकवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असेच दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही त्यांनी अशा गुन्ह्यांचे सत्र चालवले असण्याची शक्यता आहे. सध्या ताब्यात घेतलेले ६ आरोपी पोलीस कोठडीत असून,  पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात रायगड पोलीस दलाने दाखवलेली तत्परता आणि समन्वयाचे कौतुक सर्वत्र होत आहे.