रायगड (जिमाका) : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम लोक चळवळ बनली असून यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. यंदा देखील हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
हर घर तिरंगा अभियानंतर्गत पहिला टप्पा 8 ऑगस्टपर्यंत, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या तीन टप्प्यात करावयाच्या कार्यवाही बाबत शासनाकडून सूचना आलेल्या आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय/निमशासकीय सहकारी/खासगी आस्थापना कार्यालयात, अमृत सरोवर, वारसा स्थळे या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वारसा स्थळांच्या ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवर स्पर्धा तसेच, रॅली, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.