अंमली पदार्थाचे जाळे रायगड ते प्रतापगड (राजस्थान)


रायगड (प्रतिनिधी) : महाड MIDC पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ८९ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात अटक झालेल्या चार आरोपींची तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली.

चौकशीत आरोपींनी सांगितले की, उर्वरित अमली पदार्थ राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील हथुनिया गावात १० फूट खोल पुरून ठेवले आहेत. हा माल त्यांच्या साथीदार सिद्दिक फिरोज खान याने लपवून ठेवल्याचेही त्यांनी कबूल केले.

महाड, अलिबाग, गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. पथकात पोसई सुदर्शन काजरोळकर (महाड शहर पोलीस ठाणे), पोना इक्बाल शेख (महाड MIDC), पोलीस शिपाई नारायण दराडे (महाड MIDC) आणि पोलीस शिपाई शितल बंडगर (महाड तालुका) यांचा समावेश होता.

राजस्थानमधील कारवाईदरम्यान सिद्दिक फिरोज खानला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या खानने अखेर कबुली दिली — “माल मी दहा फूट खोल पुरला आहे.” त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

या आंतरराज्यीय कारवाईत रायगड पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की गुन्हेगार कुठेही पळला तरी न्यायाच्या हातापासून सुटू शकत नाही.

विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी या मोहिमेतील धाडस आणि कार्यक्षमतेचे कौतुक करून पथकाचा सत्कार केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल (रायगड), अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे (रायगड) आणि पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे (स्थानीय गुन्हे शाखा, अलिबाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.