जिल्ह्यात 1,02,198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळांचे गणपती
रायगड (प्रतिनिधी): जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असून, यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात यंदा 1,02,198 खासगी गणेशमूर्ती आणि 286 सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती बसवले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, कोकणात उत्सवासाठी परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी महसूल, पोलिस, नगरपालिका, ग्रामपंचायत यांसह सर्व शासकीय विभाग सज्ज आहेत. गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
प्रशासनाने गणेश भक्तांच्या सोयीसाठी महामार्गांवर सुविधा केंद्र, पोलिस मदत केंद्र, क्रेन, टोईंग व्हॅन, वाहन दुरुस्ती कक्ष, वैद्यकीय सुविधा, अॅम्ब्युलन्स, मोफत पाणी, ओआरएस, चहा, बिस्कीट, महिलांसाठी फीडिंग कक्ष अशा सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या प्रवेशावर 23 ते 29 ऑगस्ट, 2 ते 4 सप्टेंबर आणि 6 ते 8 सप्टेंबरदरम्यान बंदी असेल.
विसर्जनासाठी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर 52, खाडीत 105, नदीत 244, तलावात 100 आणि इतर ठिकाणी 94 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
दरम्यान, 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सणानिमित्त जिल्ह्यात नमाज पठण व मिरवणुका होणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त असेल. गणेशोत्सव काळात पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, एटीबी, एटीसी पथक, सायबर सेल व दंगाकाबू पथके सतर्क राहणार आहेत. शांतता समिती, मोहल्ला बैठक, गावभेटी आणि रूट मार्चद्वारे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.