अलिबाग (प्रतिनिधी) : तालुक्यातील मच्छीमार बांधव आणि त्यांच्या प्रश्नांसंदर्भात अलिबाग व पोयनाड विभागातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची गुरुवारी (ता. १३) मंत्रालयातील दालनात त्यांची भेट घेतली. या प्रश्नासंदर्भात नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या बैठकीत बोडणी येथील मच्छीमार जेटीचे प्रलंबित काम गतीने पूर्ण करणे, १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना लँडिंग वेळी होणार त्रास, प्रलंबित डिझेल परतावा, पारंपरिक मच्छीमार बांधवांना संरक्षण मिळणे, मच्छीमार जेट्टीचा विकास आणि पुनर्बाधणी, जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी निधीची पूर्तता करणे या सर्व प्रश्नांसंदर्भात नितेश राणे यांच्याशी चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नितेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

या वेळी उरणचे भाजप आमदार महेश बालदी, भाजप जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, भाजप नेते आस्वाद पाटील, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, भाजप अलिबाग तालुकाध्यक्ष रोशन भगत, चेतन पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि कोळीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
