अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत जे.एस.डब्ल्यूच्या विस्तारित तिसऱ्या प्रकल्पाला एकमुखी संमती देण्यात आली. आज (१५ ऑगस्ट २०२५) सकाळी १० वाजता झालेल्या या बैठकीत तब्बल ९३५ ग्रामस्थांनी हात वर करून ठरावाला पाठिंबा दर्शविला. सभेचे अध्यक्षस्थान शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी भूषविले.
बैठकीत प्रकल्पामुळे होणारे स्थानिक फायदे – विकासकामे, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा उभारणी – यावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, हा प्रकल्प गावाच्या प्रगतीसाठी नवा मार्ग खुला करेल व सर्वांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल.
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह हा ठराव अधिकृतरीत्या नोंदवून लवकरच शासन व संबंधित यंत्रणांकडे पाठविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने या प्रकल्पाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला होता. “या प्रकल्पामुळे गावातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि बेरोजगारी कमी होईल. त्यामुळेच ग्रामसभेत एकमुखी पाठिंबा मिळाला,” असे श्री. केणी यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभा विशेष मानल्या जातात. याच स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत हा महत्त्वाचा ठराव पारित झाला.









