विहिरीवरची दहीहंडी कुर्डुस गावाचा थरारक सोहळा


रायगड (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड जवळील कुर्डुस गावात दरवर्षी साजरी होणारी विहिरीवरील दहीहंडी ही अनोखी परंपरा यंदाही नेत्रदीपक थराराने पार पडली. सन १९९१ पासून सुरू झालेल्या या परंपरेने आजवर हजारो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मानवी पिरॅमिड न रचता थेट विहिरीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या हंडीसाठी रायगडासह मुंबईतील अनेक गोविंदा पथके खास हजेरी लावतात.
या दहीहंडीचे आयोजन देवळाली गोविंदा पथक कुर्डुस यांच्या मार्फत करण्यात येते. पराग पिंगळे, सचिन पिंगळे, गुरुनाथ शेरामकर, सुशीलकुमार पिंगळे, गणेश केणी यांसारखे पिंगळे कुटुंबीय कार्यवाहक म्हणून मोठ्या उत्साहाने या सोहळ्याची जबाबदारी सांभाळतात.

विशेष म्हणजे, या दहीहंडीमध्ये गोविंदांना विहिरीच्या गोल कठड्यावर बसवले जाते. काहीजण आपल्या पंजावर सहकारी गोविंदाला उचलून थेट हंडीकडे झेप घेण्यास मदत करतात. हंडीला हात लावल्यावर तो गोविंदा थेट विहिरीच्या पाण्यात कोसळतो. जर थोडा अंदाज चुकला तर कठड्यावर पडण्याचा धोका असतो. त्यामुळे हा थरार उत्साहासोबतच जीवाची पर्वाही मागतो.
यावर्षीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील विविध वृत्तपत्रे, वाहिन्या व छायाचित्रकार खास कुर्डुसमध्ये दाखल झाले होते. गावकऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. सर्व पत्रकार आणि छायाचित्रकारांनी या नेत्रदीपक दृष्यांचे टिपलेले क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले.
विहिरीवरील दहीहंडीचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कुर्डुस गावातील ही परंपरा आता हळूहळू राज्यातच नव्हे तर देशातही चर्चेचा विषय बनत चालली आहे.