अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था; प्रवासी व वाहनचालक त्रस्त


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याचे मुख्यालय तसेच राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या अलिबागकडे जाणारा अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग सध्या अत्यंत दुरावस्थेत आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी, अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी प्रवाशांना दीड ते दोन तासांचा कालावधी खर्च करावा लागत असून, महामार्गावर वाहतूक कोंडीची तीव्र समस्या उद्भवली आहे.

पाच वर्षे देखभालीकडे दुर्लक्ष

गेल्या पाच वर्षांपासून या महामार्गाच्या मालकी व देखभालीवरून वाद सुरू होता. सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपवला होता. परंतु चौपदरीकरणासाठी लागणारा खर्च प्रचंड असल्याने प्राधिकरणाने या कामात स्वारस्य दाखवले नाही. अखेरीस हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला; मात्र हस्तांतरणाची प्रक्रिया अपुरी राहिल्याने देखभाल आणि दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. परिणामी, आज महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे.

प्रमुख मार्गांची दुर्दशा

वडखळ-धरमतर, शहाबाज- पेझारी, तिनविरा-कार्लेखिंड आणि वाडगाव-अलिबाग या मार्गावर सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्यांत पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज बांधणे कठीण जाते. त्यामुळे वारंवार अपघात व वाहनांचे नुकसान होत असून, चालकांवर आर्थिक भार वाढतो आहे.

वाढती वाहतूक, अरुंद रस्ता

गेल्या काही वर्षांत अलिबाग हे विकेण्ड होम डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध झाले असून, पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच जेएसडब्लू, आरसीएफ, गेल या औद्योगिक प्रकल्पातील मालवाहतूक तसेच पिएनपी बंदरातून होणाऱ्या कोळसा व लोहखनिज वाहतुकीमुळे महामार्गावरील अवजड वाहनांची संख्याही प्रचंड आहे. अरुंद रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे खड्ड्यांनी पोखरलेला हा मार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे.

प्रशासनाचे आदेश निष्फळ

सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवार या दिवशी अवजड वाहनांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले असले तरी, रस्त्याच्या खराब स्थितीमुळे त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. प्रवासी आणि वाहनचालक या समस्येने त्रस्त झाले आहेत.

नागरिकांची मागणी

महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात, प्रवासातील होणारा विलंब आणि वाहनांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता नागरिक व प्रवासी यांच्यात प्रचंड संताप आहे. “अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा स्थानिकांकडून देण्यात येत आहे.